श्री सदगुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट

प्रेस विज्ञप्ति

सूर्योदय परिवाराच्या वतीने २५ जूनला‘मानवतेचा महाकुंभ’ 24-06-2016

दुष्काळमुक्त मराठवाडा अभियानाचा समारोप व पूर्ण योजनांचे लोकार्पण

सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते उद्घाटन 

औरंगाबाद, दि. २३ जून : जनसहकार्यातून समाजकल्याणाकडे या संकल्पनेतून देशभरात कार्यरत असलेल्या सूर्योदय परिवाराच्या वतीने ‘मानवतेचा महाकुंभ सोहळा-२०१६’आयोजित करण्यात आला आहे.या महाकुंभ सोहळ्या अंतर्गत येत्या २५ जून रोजी बीड येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात दुपारी एक वाजता एका भव्य कार्यक्रमात दुष्काळमुक्त मराठवाडा अभियानाचा समारोप होणारआहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते हा समारोपहोणार असून याचवेळी अभियानाअंतर्गत राबविल्या गेलेल्या अनेक पूर्णउपक्रमांचे उद्घाटन व लोकार्पण होणार असल्याची माहिती सूर्योदय परिवाराचे संस्थापक सद्गुरू डॉ. श्री. भय्यूजी महाराज यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना भय्यूजी महाराज म्हणाले, “आज मराठवाडयातील शेतकरी बांधव हा नैसर्गिक परिस्थितीमुळे अडचणीत सापडला आहे. अशावेळी त्याला मदत करणे हे आपले कर्तव्य असून सूर्योदय परिवार नेहमीच या बांधवांच्या मदतीला उभा राहत आला आहे. याहीवेळी आम्ही मराठवाड्याच्या मदतीसाठी एकत्रीतपणे उभे आहोत. त्यानिमित्ताने आयोजित ‘मानवतेचा महाकुंभ-२०१६’ या उपक्रमाअंतर्गत गेल्या चार महिन्यात मराठवाड्यात केलेल्या कामाचा समारोपही करण्यात येणार आहे.अभियानाचा समारोप तसेच शेतकरी व ग्रामीण बांधवांसाठी राबविलेल्या अनेकविध योजनांचे उद्घाटन व लोकार्पणराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे, बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे, बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर, रावेरच्या खासदार रक्षा खडसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित असतील.”

सूर्योदय परिवाराच्या वतीने बीडमध्ये गरीब व अल्पभूधारक शेतक-यांना बियाणे वाटप योजने अंतर्गत बारा हजार शेतक-यांना नि:शुल्क बियाणे वाटप, सूर्योदय शिष्यवृत्ती अंतर्गत गरीब शेतक-यांच्या पाचशे मुला मुलींना सायकल वाटप, सूर्योदय शिष्यवृत्ती अंतर्गत अल्पभूधारक शेतकरी, पारधी समाज, कैदी बांधव, ऊसतोड कामगारांच्या पाच हजार मुला मुलींना शिष्यवृत्तीचे वाटप, सूर्योदय आधार योजने अंतर्गत शेतकरी परिवार व गरीब लोकांकरिता १ लाख आधार कार्डचे वितरण, १२५० आत्महत्याग्रस्त व गरीब शेतक-यांना किराणा साहित्य वाटप, गरीब व अल्पभूधारक शेतका-यांच्या मुला मुलींना १३ बैलजोड्यांचे वाटप, गरीब शेतक-यांच्या मुला मुलींना उच्च शिक्षण देण्याकरिता ‘हायर एज्युकेशन अॅट युवर डोअर’च्या ५० केंद्रांची स्थापना, पशुंकरीता पिण्याच्या पाण्याच्या १०१ हौदांचे वितरण, सूर्योदय संमिश्र बालगृह अंतर्गत पारधी समाज, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, बंदी बांधव, वारांगणांची मुले व नैसर्गिक आपत्तीने ग्रस्त मुले, बंदी पुनर्वसन केंद्र, तृतीयपंथी पुनर्वसन प्रशिक्षण केंद्र, निराधार वृद्धांचे वृद्धाश्रम व ऊसतोड कामगारांच्या आई-वडीलांचे निवारा केंद्र, चलित (मोबाईल) मृदा व जल परिक्षण प्रयोगशाळा, शासकीय शालेय विद्यालयाकरीता सूर्योदय विज्ञान रथ (चलित प्रयोगशाळा), सूर्योदय परिवार व सद्गुरू डॉ. श्री. भय्यूजी महाराजांचे अॅप, जलसंधारण योजने अंतर्गत २०० नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण, जलपूजन आदी कामे करण्यात आली आहेत

त्याचप्रमाणे सूर्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जलसंधारण योजनेअंतर्गत ४२७ नाल्यांचे खोलीकरण आदी कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. याशिवाय परिवाराच्या वतीने मु. पो. मुर्टा, ता. तुळजापूर, जि उस्मानाबाद या ठिकाणी सूर्योदय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. या चारही योजनांचे उद्घाटन व लोकार्पण सदर भव्य कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. 
   
सूर्योदय परिवाराच्या उपक्रमांची माहिती देताना ते पुढे म्हणाले की, सूर्योदय परिवाराची स्थापना ही १९९९ मध्ये झाली असून परिवाराच्या वतीने दुष्काळाची भीषणता लक्षात घेत जानेवारी महिन्यापासून बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, नंदूरबार, खामगांव, बुंदेलखंड, शुजालपूर, इंदौर या ठिकाणी अनेकविध कामे हाती घेत ती पूर्ण करण्यात आली.

© 2018 All Right Reserved